शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या बोटीचा अपघात हा घातपात - अशोक चव्हाण

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात हा घातपात असल्याचा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा बोट दुर्घटनेशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना स्पीट बोटीला झालेला अपघात चिंताजनक आहे. शिवस्मारकाचं काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेलं आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या कामाला आधीच दोन वर्षे उशीर झालाय. निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाचे काम सुरू झाल्याचा देखावा निर्माण करण्याचे काम भाजपा सरकारकडून केले जात आहे. स्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याचे मेटे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बोट दुर्घटना हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात असा संशय जाणवू लागला आहे. यामागे विनायक मेटेंना शांत करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. निवडणुका जवळ येत असताना शिवस्मारकाचं काम जलद गतीनं होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

Review