शिवस्मारकाची भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे काय?

शिवस्मारक सरकार बांधत नसून भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे असे वातावरण निर्माण केले जात आहे, पायाभरणीचा कार्यक्रम रद्द झाला. महाराष्ट्रात ही कसल्या अपशकुनाची सुरुवात म्हणायची?, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.
शिवस्मारकाच्या पायाभरणीस निघालेल्या बोटीस अरबी समुद्रात जलसमाधी मिळाली. शिवस्मारकाची विधिवत पायाभरणी होऊ शकली नाही. या अपघातात एका तरुणाचा प्राण गेला. अरबी समुद्रातील शिवस्मारक म्हणजे स्वतःचीच मालकी. इतर कोणी या सोहळ्यात सहभागी होऊ नये असा अट्टहास ज्यांनी केला त्यांच्या अरेरावीपणातून हा अपघात घडल्याची टीका शिवसेनेने केली. स्मारकाच्या बाबतीत श्रद्धा कमी व राजकारण जास्त असे घडत आहे. भाजपवासी झालेल्या विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, हे अध्यक्षपद नाममात्र आहे. स्मारकाच्या उभारणीबाबत सर्व सूत्रे मुख्यमंत्री कार्यालयातून हलत असून शिवस्मारकाची सर्व कंत्राटे कोणी कोणाला द्यायची याबाबतचे अंदाधुंद आरोप–प्रत्यारोप होत आहेत, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे. हे स्मारक सरकार बांधत नसून भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे असे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोपही शिवसेनेने केला.

Review