ग्रामीण भागांमधील घरे इंटरनेटने जोडणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरणार ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबंधी भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल) व स्ट्रीम कास्ट कंपनी यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. यामुळे ग्रामीण भागांमधील घरे इंटरनेटने जोडणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरणार आहे.

गुरुवारी मुंबईत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंटरनेट जोडणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. कोकणातील पदवीधरांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिंधुदुर्गमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार असून यासाठी स्ट्रिमकास्ट कंपनी सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबरोबरच इतर चार जिल्ह्यातही या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय ही कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारणार आहे. या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान क्रांती होईल, असा दावा केसरकर यांनी केला.

या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेट टॉप बॉक्समध्ये बीएसएनएलची इंटरनेट जोडणी असणार आहे. यामधून विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक अभ्यासक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग आदी सुविधा असणार आहेत. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. स्ट्रिम कास्ट कंपनीने हे तंत्रज्ञान लो बँडविड्थवर उपलब्ध करून दिले आहे.

Review