वाद पुढाऱ्यांचा आणि खून कार्यकर्त्यांचा...
बार्शीतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादातून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे.
अंकुल ऊर्फ गोलू श्रीधर चव्हाण (वय २५, रा. अंकुश स्मृती, नाईकवाडी प्लाट्स, बार्शी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याचा भाऊ आकाश श्रीधर चव्हाण याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद दशरथ माने, सूरज ऊर्फ सोन्या प्रकाश माने, रमेश भगवान माने (रा. अलीपूर रोड, माउली चौक, बार्शी) यांच्यासह अमोल सुभाष वायकुळे, अर्जुन ऊर्फ अज्जू अरुण नागणे (रा. पाटील प्लाट्स, शिवाजी नगर, बार्शी), सागर उमेश माने, विजय ऊर्फ आबा किसन वाघ, दीपक माने (रा. अलीपूर रोड, बार्शी) तसेच अन्य चौघा अनोळखी व्यक्तींचा या गुन्ह्य़ात सहभाग होता.
बार्शी शहरात उपळाई रस्त्यावर सोलापूर जनता सहकारी बँकेच्या शाखेच्या समोर रात्री आठच्या सुमारास अंकुल ऊर्फ गोलू श्रीधर चव्हाण हा आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आपल्या वाहनाजवळ थांबला होता. त्या वेळी अचानकपणे मोटारसायकली घेऊन दहा-बारा जणांच्या जमावाने तेथे येऊन दहशत निर्माण केली व नंतर अंकुल चव्हाण याच्यावर तलवारी, कोयता, लोखंडी गज, लाकडी दांडके व दगडाने जोरदार हल्ला केला. त्याला लाथाबुक्क्य़ांनीही मारहाण केली गेली.
अंकुल हा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांचा मुलगा होता. त्याचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. चव्हाण कुटुंबीय राष्ट्रवादीचे आमदार सोपल गटाशी एकनिष्ठ आहेत. मृत अंकुल चव्हाण याने वाहनाला किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून संशयित आरोपीपैकी सूरज ऊर्फ सोन्या माने यास चापट मारली होती. त्याचा राग मनात धरून माने व इतरांनी त्याला उपळाई रस्त्यावर एकटा असताना गाठले आणि त्याचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास बार्शी पोलीस करत आहे...