अवनी, आम्हाला माफ कर - सामनामधून शिवसेनेने मागितली वाघिणीची माफी

अवनी, तू मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. अशा शब्दात शिवसेनेने अवनी या वाघिणीची माफी मागितली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे कि,
नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा जंगलातील या वाघिणीने हैदोस घातला होता हे खरे. दोन वर्षांत तिने १३ जणांचा जीव घेतला. ही वाघीण पाच वर्षांची होती व तिने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला होता. हे दोन्ही बछडे आता निराधार झाल्याचे दुःख वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले आहे. अवनी वाघीण नरभक्षक झाली. पण वाघ, सिंह हे नरभक्षक झाले व त्यांनी मनुष्यप्राण्यांवर झडप घातली यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? सापाच्या बिळात हात घातल्यावर तो डंख मारणारच. सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे?

‘नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालण्यापेक्षा मनुष्याने स्वतःस शिस्त लावणे गरजेचे आहे. निदान आता ‘अवनी’च्या निमित्ताने तरी या प्रश्नाचा सरकारी पातळीवर एकत्रितपणे आणि साकल्याने विचार व्हायला हवा. हे काम वन खात्याचे जसे आहे तसे इतर सरकारी खात्यांचेही आहे. एरवी राज्यकर्ती मंडळी सर्वांना घर, ‘घर घर शौचालय’ वगैरे घोषणांचे ढोल पिटत असतात, पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या सावटाखाली एकेक क्षण जगणाऱ्या जनतेला द्या ना त्यांचे हक्काचे सुरक्षित घर. फक्त घोषणांचीच जुमलाबाजी सुरू असल्याने ‘अवनी’सारख्या घटना घडतात आणि मग वन्य प्राण्यांना ‘नरभक्षक’ ठरवून त्यांचा बळी घेतला जातो.

खुद्द केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीच ‘अवनी’ची निर्घृण हत्या झाल्याचे आणि हा एक मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या शूटरने अवनीला गोळ्या घातल्या त्याचे वडील शाफत अली खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे आणि काही हत्ती मारले आहेत. तरीही महाराष्ट्र सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी अशा माणसाला का दिली असा सवाल करत मनेका यांनी शाफत हे अवैध शस्त्रे पुरविणारे राष्ट्रविरोधी आहेत असाही गंभीर आरोप केला आहे. मनेका यांचा हा संताप महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. या आरोपांचा पटेल असा खुलासा राज्यकर्त्यांनीच करायचा आहे. कारण आरोप करणारे आणि ‘आरोपी’ एकाच पक्षाचे आहेत.

यवतमाळ-पांढरकवडा परिसरात सरकारी नादानीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या. कीटकनाशकांमुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे बळी यवतमाळमध्ये गेले. त्यातील गुन्हेगारांना कोणी अवनीप्रमाणे कठोर शिक्षा दिल्याचे दिसले नाही. दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळेही या राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. सगळेच मूग गिळून गप्प बसतात, वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. वाघ, सिंह, बिबटे वगैरेंना जंगलांमधून विस्थापित करणाराही माणूसच आहे आणि नंतर माणसावर हल्ले केले म्हणून त्यांना ‘नरभक्षक’ ठरवून गोळ्या घालणाराही माणूसच आहे. त्यानेच आता अवनीला रात्रीच्या अंधारात ठार मारले. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर.

Review