दिवाळी पहाट निमित्त सुरेल मैफलीचा आनंद !

ज्योती कलश छलके, सखी मंद झाल्या तारका, धुंदी कळयांना, एक धागा सुखाचा, विकत घेतला शाम, एका तळ्यात होते, आज पहली तारीख है ना, तेरे सूर और मेरे गीत, घन घन माला, जीवलगा कधी रे येशील तू, गोरी गोरी पान , विठ्ठला तू वेडा कुंभार अशी सुधीर फडके उर्फ बाबूजी , ग.दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या अवीट गोडीच्या गीतांची बरसात झाली आणि पुणेकर रसिक भारावून गेले !

‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट च्या निमित्ताने 'गोल्डन मेमरीज ' निर्मित 'गान वंदना' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ६१ वा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाच्या माध्यमातून गदिमा आणि सुधीर फडके (बाबूजी ) यांचा जीवनपट उलगडला जाऊन त्यांना सांगितिक मानवंदना दिली गेली.

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

ग. दि. माडगूळकर (ग.दि.मा) आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम सोमवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे झाला.

‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘ आयोजित हा पहिलाच दिवाळी पहाट कार्यक्रम होता.

शशांक दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळुंजकर या गायकांनी एकाहून एक सुरेल गीते सादर केली. प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, राजेंद्र साळुंखे यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले यांनी केले. कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांची होती.

'गोल्डन मेमरीज' संस्था गेली चार वर्षे महाराष्ट्रभर गीतांचा प्रसार करीत आहे. आज ५ नोव्हेंबर २०१८ रोजी संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. त्या निमित्त सर्वांचा सत्कार करण्यात आला. या पाच वर्षात संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे एकूण ३८७ कार्यक्रम सादर केले आहेत, अशी माहिती गोल्डन मेमरीज संस्थेच्या चैत्राली अभ्यंकर यांनी दिली.

Review