राम जन्मभूमी प्रकरण तातडीच्या सुनावणीची हिंदू महासभेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...
अयोध्या प्रकरणी तातडीची सुनावणी करण्याची अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
जनभावना लक्षात घेता याप्रकरणी त्वरीत सुनावणी व्हावी असे अपील हिंदू महासभेने केले होते. दरम्यान, राम मंदिर प्रकरणी मागील सुनावणीवेळी केवळ तीन मिनिटांच्या आत न्यायालयाने २०१९ च्या जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तींच्या पीठाने याप्रकरणी जानेवारी २०१९ पर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली होती. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशिवाय न्या. कौल आणि न्या. के एम जोसेफ यांचा समावेश होता.
या निर्णयानंतर भाजपा नेत्यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. तत्पूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही सरकारला अध्यादेश काढून अयोध्येत राम मंदिराची निर्मिती करावी, असे अपील केले होते.