चिमुरडीचे अपहरण, पोलीसांची तत्परता, आणि गुन्हेगार गजाआड...
भर दिवसा १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून लाखो रुपये खंडणी मागणाऱ्या नराधमांना बारा तासात गजाआड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
माही जैन ( क्वीन्स टॉऊन, चिंचवड ) असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव असून
नितीन गजरमल (वय - २५, परांडा, उस्मानाबाद ) आणि जितेंद्र बंजारा ( वय -२१, वाकड ) अशी आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातून काल (शुक्रवार) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपहरणाची ही घटना घडली. माही जैन ही क्वीन्स टाऊन सोसायटीत राहणारी आहे. सोसायटी शेजारी असणाऱ्या एका दुकानात माही पेन्सिल आणण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडली. पेन्सिल घेऊन परत येत असताना गाडीत थांबलेल्या दोघांनी तिला जबरदस्तीने गाडीत खेचलं. त्यावेळी माही ओरडली आणि तो आवाज दुकानदाराने ऐकला. पण दुकानदाराने धाव घेईपर्यंत ते अपहरणकर्ते माहीला घेऊन गेले होते. दुकानदाराने घडलेल्या प्रकाराबाबत माहीच्या पालकांना माहिती दिली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी आपली तपासचक्र फिरवली. त्यानंतर पोलिसांची तब्बल 17 पथकं रवाना करत राज्यभर नाकाबंदी करून माहीसाठी शोध मोहीम राबवली गेली. त्यानंतर रात्री 8 वाजता पैश्याची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा माहीच्या वडिलांना फोन आला. पोलिसांनी लगेच फोनचं लोकेशन ट्रेस करत अखेर रात्री 2 वाजताच्या सुमारास माहीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करत तिला पालकांच्या ताब्यात दिलं.