अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा निकाल वर्षभरात...
पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा निकाल वर्षभरात देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली होती. यातील एक आरोपी राजू पाटील यांच्या जामीन अर्जावर सप्टेंबर महिन्यात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळतानाच कोल्हापूर सत्रन्यायालयालाही आदेश दिले होते.
हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे की, या खटल्यातील सर्व गोष्टींचा विचार करता खटला लवकर चालवणे अपेक्षित आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी या खटल्याची सुनावणी तातडीने पूर्ण करावी. आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत या खटल्याची सुनावणी पूर्ण करावी, असे यात म्हटले आहे.
दरम्यान, अश्विनी बिद्रे यांची पती राजू गोरे यांनी सरन्यायाधीशांना निवेदन पाठवले होते. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.