दौ-यावर पदाधिका-यांनी उधळपट्टी थांबवावी - समाजवादी पक्षाची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिका-यांकडून देश, विदेश दौरे केले जात आगेत. त्याचा प्रत्यक्ष शहराच्या विकासात लाभ होत नसल्याने हे अभ्यास दौरे रद्द करून त्यावर होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी समाजवादी पक्षाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत असलेले जकात व एलबीटी बंद झाल्याने पालिकेचे आर्थिक स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे भाजपने महापालिकेत काटकसर करून बचतीचे नवे धोरण अंवलबले आहे. सत्ताधार्यांनी काही फुटकळ खर्चाना फाटा देत शाबासकी मिळविली. बचतीचे धोरण असूनही, दुसरीकडे सत्ताधार्यांकडून वारेवाप उधळपट्टी केली जात आहे.
या दौर्यात पदाधिकारी व नगरसेवकांसह अधिकारीही सामील होत आहेत. स्मार्ट सिटी, महापौर परिषद, मेट्रो सिटीची पाहणी, बीआरटीएस सेवेची पाहणी, शाळांचा दर्जा, महिलांसाठी लघुउद्योग, स्टेडियम, स्वच्छ भारत अभियान, परिषद, प्रदर्शन असा विविध कारणांसाठी दौरे आयोजित करण्याचा सपाटा सुरू आहे. दौ-याच्या नावाखाली सहली घडविणे थांबवा, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे.