चार आण्याची कोंबडी, भाजपचा बाराण्याचा मसाला करोडोंचा खर्च करून जाहिरातींचा तमाशा कशाला
मुंबई ( सह्याद्री बुलेटिन) - राज्य सरकारने विधीमंडळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले. पण, या विधेकाच्या मंजरीनंतर रस्त्यावर उतरणा-या आणि जिवावर उदार झालेल्या मराठा समाजाने जेवढा जल्लोष केला नाही. त्याहून अधिक जल्लोष भाजपच्या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांकडून राज्यभर सुरू आहे.
आरक्षण जाहीर झालेल्या क्षणापासून करोडोंच्या जाहिराती बुक झाल्या आहेत. पानेच्या पाने भरून वर्तमानपत्रे आणि न्युज चँनलवर "शब्द पाळला," वैगरे पालुपदे सुरू झालेलीच आहेत. आरक्षणाच्या श्रेयावरून आता राजकीय पक्षांची जुंपली आहे. समस्त महाराष्ट्र हा सर्व तमाशा पहात आहे. यात बराचसा वाट सत्ताधारी म्हणून भाजपचा आणि सेनेचा आहे. यात तिळमात्र शंका नाही. आणि हे श्रेय यांनी घेण्याला काहीच हरकत नसावी. पण, भाजपायी जो आतेताईपणा करत आहेत. तो शोभनीय मुळीच नाही. केवळ आम्हीच आरक्षण दिले हे दाखवण्यासाठी करोडो रुपयांच्या जाहिराती देणे, हे कोणते शहाणपण आहे?
मराठा आरक्षण मिळाले याचे खरे श्रेय फक्त 4 जणांना असेल. गेली 6 वर्ष स्वखर्चाने आरक्षणाची केस लढणारे विनोद पाटील, मोर्चात सहभागी झालेले करोडो लोक, जिच्यामुळे मराठा समाज एकत्र आला ती कोपर्डीची ताई आणि आंदोलनात बलिदान दिलेले बांधव यांची कोणाला आठवण तरी आहे का ? राजकीय नेत्यांनी केवळ जाहिरातबाजी करून किंवा एकमेकांवर टीका करून तमाशा करू नये, महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना करोडोंच्या जाहिराती देणे हा निव्वळ कोडगेपणाचं नाही, तर राजकीय निर्ल्लज्जपणा आहे.