उत्तर भारतीयांसमोर बोलताना राज ठाकरे यांनी मांडलेले काही महत्वाचे मुद्दे
उत्तर भारतीयांसमोर बोलताना राज ठाकरे यांनी मांडलेले काही महत्वाचे मुद्दे
१) मला हिंदी हि चांगले येते
फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे.
मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे. माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट.
२) हिंदी राष्ट्रभाषा नाही
हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नाही.
३) खरी समस्या काय
पहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजलं पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील. या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटलं जातं. पण आंतरराज्य कायदा कोणी वाचला आहे असं वाटत नाही. एक राज्य सोडून येता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणं गरजेचं असतं. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असं होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते.
४) रेल्वे परीक्षेदरम्यान झालेली मारहाण, फेरीवाले
जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे यामध्ये काय चुकीचं आहे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इंडस्ट्री जात असेल तर तेथील लोकांना प्राथमिकता दिली पाहिजे असं पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं.
५) उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी
उद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही. याचं कोणाकडेही उत्तर नाही .
६) मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता
माझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या.
७) राज ठाकरें टार्गेट का?
एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. परदेशात गेल्यानंतर हिंदीत बोलतो का ? महाराष्ट्रात जे झालं त्याचं जे चित्र निर्माण कऱण्यात आलं ते इतर राज्यांच्या बाबतीत का नाही झालं. गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असं म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचं रक्त उसळलं नाही, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली होती. तिथे मोठं आंदोलन झालं होतं. त्याचंही काही झालं नाही. त्याबद्दलही कोणी बोलत नाही.
८)ओझं कमी आहे का आमच्या राज्यावर
एक महिन्यापूर्वी तर बिहारींना गुजरातमधून हाकललं होतं. 10 ते 15 हजार लोक मुंबईत आले. कोणत्याही राज्यातून हाकललं की मुंबईत येतात. आधीच ओझं कमी आहे का आमच्या राज्यावर. पण हा प्रश्न कोणी नरेंद्र मोदींना विचारत नाही.
९) रेल्वेच्या नोकरीची जाहिरात
रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या. आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही खवळला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का ? उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का ?
१०) तुमचा स्वाभिमान कुठे
तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही?
११) मराठी माणसाची प्रगती व्हावी हीच माझी इच्छा
तुम्ही तुमच्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. ऐकत नसतील तर आम्ही आहोतच. ही दादागिरीची भाषा नाही आहे. राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा असली पाहिजे. प्रश्न तिरस्कार करण्याचा नाहीये, पण ती वेळ येऊ नये. महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची प्रगती व्हावी हीच माझी इच्छा.