दारुड्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
पिंपरी-चिंचवडमध्ये दारुड्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे.
जय देविदास तेलवानी (वय -३५) असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर तृप्ती जय तेलवानी असं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पत्नीचे नाव आहे.
तृप्तीला दारू आणि शॉपिंग चे व्यसन होते त्यामुळे तिला नेहमी पैसे खर्च करावे लागत. आरोपी तृप्तीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जयची आई कांचन देविदास तेलवानी यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात मयत जय देविदास तेलवानी याने पत्नीच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपविले होते. त्यानंतर जयच्या कुटुंबाने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे असा आरोप करत चिखली पोलिसात सुनेविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात सून तृप्ती जय तेलवानी ही दोषी आढळली आहे. पती-पत्नी हे गेल्या काही वर्षांपासून आई वडीलांपासून स्वतंत्र राहतात. जय हा प्लंबरचे काम करायचा तर तृप्ती गृहिणी होती. संसार सुखाचा सुरू असताना पत्नीला दारूचे व्यसन लागले. तसेच ती मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करत होती. पती जयला पैशांसाठी तगादा लावायची, यासाठी तिने एकदा कर्जाचे पैसे काढायला भाग पाडले होते. पैशांची पूर्तता न केल्यास तृप्ती जयला शिवीगाळ करत मारहाण करायची. पुढे चालून तिने स्वतःआत्महत्या करण्याची धमकी जयला दिली होती. जय पूर्णतः मानसिक तणावाखाली आला होता.