कामगार उपआयुक्त कार्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा जाणीवपुर्वक विसर
पुणे - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात आज सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येत असताना पुणे कामगार उपआयुक्त कार्यालयाने चक्क परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्याचे टाळत नवीन वादाला तोंड फोडले आहे, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांच्या आक्रमक भुमिकेमुळे कार्यालय बंद होण्याच्या वेळेस सायंकाळी ५ वाजता पुजन केले, यामुळे कामगार संघटना व शासकीय अधिकारी यांच्यात थोडी बाचाबाची झाली.
आज देशभरात सगळीकडे या महामानवाच्या महानिर्वाणदिनामुळे नम्रतेने अभिवादन करण्यात येत असताना पुणे अतिरिक्त कामगार आयुक्तांनी मुंबईहुन कामगार आयुक्त राजीव जाधव येतील तेव्हाच पुष्पहार घालुन पुजन करण्यात येईल अशी आडमुठी भुमिका घेतली, भिंतीवर असलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला स्वच्छ करून पुजनासाठी टेबलावर ठेऊन पुष्पहारही घालण्याचे कामगार अतिरिक्त आयुक्त शैलेश पोळ यांनी जाणीवपुर्वक टाळले.
बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी याविषयी आक्रमक भुमिका घेत पोळ यांना चांगलाच जाब विचारला परंतु आडमुठ्या पोळ यांनी "आम्हाला सर्व कळतं आम्हाला आमचं काम शिकवु नका, आयुक्त साहेब आल्यावरच पुजा करणार असल्याची भुमिका घेतली", यावेळी काही काळ शाब्दिक चकमकीही उडाल्या, कामगार संघटनेचे इतर प्रतिनिधीही उपस्थित झाले, सर्वांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करत वरिष्ठांकडे याची तक्रार करण्याची कुणकुण लागल्यावर व इतर कामगार अधिकाऱ्यांना चुक लक्षात आल्यावर सायंकाळी ५ वाजता प्रतिमा भिंतीवरून खाली उतरून पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.
यावेळी मनसे कामगार आघाडीचे मिलिंद सोनवणे, सिटूच्या कामगार प्रतिनिधी भारती अवसरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष शिंदे म्हणाले की, "कामगार अतिरिक्त आयुक्तांना आज बाबासाहेबांपेक्षा कामगार आयुक्त राजीव जाधव हे मोठे वाटू लागले आहेत, ज्या बाबासाहेबांमुळे ते या खुर्चीवर बसले आहेत त्यांचा जाणीवपुर्वक विसर करणे ही खेदाची बाब आहे लवकरच याची मुख्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करणार आहे व या घटनेचा जाहीर निषेध करतो."