पुरंदर विमानतळाच्या आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी
मुंबई - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची 65 वी संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री तथा कंपनीचे अध्यक्ष श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभाग (नागरी हवाई वाहतूक) प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक कविता गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वतीने पुरंदर येथे छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (ग्रीनफिल्ड) विकसित करण्यात येत आहे. या विमानतळाच्या आराखड्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी सल्लागार नेमण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच या प्रकल्पाच्या कार्यान्वयासाठी प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. अमरावती येथील बेलोरा विमानतळाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.