अदानी कंपनीच्या विद्युत देयकांच्या तपासणीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा एमईआरसीचा निर्णय

मुंबई - अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे (एमईआरसी) अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.


याप्रसंगी आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर आणि आय. एम. बोहरी उपस्थित होते. यावेळी श्री. कुलकर्णी म्हणाले, मुंबई उपनगरातील अदानी कंपनीच्या ग्राहकांना नोव्हेंबर 2018 मध्ये नियमित दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके प्राप्त झाली आहेत. त्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची आयोगाने स्वयंप्रेरणेने दखल घेतली तसेच अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण मागविले होते. अदानी कंपनीच्या 27 लाख ग्राहकांपैकी जवळपास 1 लाख 10 हजार निवासी ग्राहकांना सुमारे 20 टक्के वाढीव दराची वीज देयके प्राप्त झाली आहेत.

 

कंपनीच्या प्रतिनिधींनी आयोगासमोर उपस्थित राहून स्पष्टीकरण दिले. ऑक्टोबर महिन्यातील उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता पातळीमुळे अधिक वीज वापर, मागील देय इंधन समायोजन आकारांचा (एफएसी) काही हिस्सा या वीज देयकामधून वसूल करणे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कडून अदानी कंपनीकडे वितरण परवान्याच्या मालकीचे हस्तांतरण होताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे मीटर वाचन उपलब्ध नसणे; व त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांची वीज देयके सरासरी वापराच्या तत्त्वावर पाठविण्यात आली. तथापि, असा निर्धारित वापर ऑक्टोबर 2018 च्या प्रत्यक्ष मीटर वाचनाच्या आधारे समायोजित करण्यात आला, असे स्पष्टीकरण अदानी कंपनीच्या वतीने देण्यात आले.

Review