वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत - बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. तिथे जनावरांच्या चारापाण्याची सोय उत्तम होईल, अशी टीका करत माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला चारा छाणवीवर बोलताना दिला होता. शिंदे यांच्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटू लागले असून शुक्रवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. थोरात म्हणाले, राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळात सरकारने जनतेला धीर देणे गरजेचे आहे. तातडीने पिण्याचे पाणी, चारा, रोजगार हमीची कामे दिली पाहिजेत. आता सर्वत्र दुष्काळ असल्याने कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधा, असे त्यांनी सांगितले.