मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाही - रामदास आठवले

देशात मंदिर आणि पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

रामदास आठवले यांनी शुक्रवारी खोपोलीत पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी मराठा आरक्षणासह राम मंदिर, प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप आणि ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाच्या आघाडीबाबत मते मांडली.
मंदिर आणि पुतळे बांधून विकास होतो का?, असा प्रश्नही आठवले यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर आठवलेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ‘मंदिर आणि पुतळे बांधली नाहीत तर मते मिळणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला तरी बाबासाहेबांचा पुतळा होणारच असे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. मात्र, याजागेसंदर्भात सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. राम मंदिर बांधताना मुस्लीम समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती काँग्रेसची मतं खाणार आणि त्‍याचा फायदा भाजपाला होईल, असे मत आठवले यांनी व्‍यक्‍त केले.

Review