पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटीसाठी मिळाला 207 कोटींचा निधी
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकारचे मिळून एकत्रित 207 कोटी रुपयांचा तिसरा हप्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिला आहे. स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्यापासून आतापर्यंत एकूण 291 कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. सरकारकडून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी प्रथम मोठा निधी देण्यात आला आहे.
शहराचा स्मार्ट सिटीत उशिराने समावेश झाल्यानंतर शासनाकडून निधी मिळण्यास देखील विलंब झाला होता. शहराचा संपुर्ण स्मार्टसिटी प्रकल्प एक हजार कोटींचा आहे. त्यात प्रतिवर्षी १०० कोटी या प्रमाणे निधी सरकारकडून उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, तसे झाले नाही. मागील तिन वर्षांमध्ये एप्रिल २०१८ मध्ये पहिला २७ कोटी रुपयांचा हप्ता महापालिकेकडे जमा झाला होता. त्यानंतर नंतर जुलै 2018 मध्ये दुसरा ५७ कोटी रुपयांचा हप्ता महापालिकेला मिळाला. त्यानंतर नुकताच तिसरा हप्ता महापालिकेला मिळाला असून तो तब्बल 207 कोटी रुपयांचा आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी आतापर्यंत एकूण 291 कोटी मिळाले असून सर्वाधिक निधी महापालिकेला चालू आर्थिक वर्षात प्राप्त झाला आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गंत शहरात बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांची निविदाप्रक्रिया सुरू आहे. ही कामे करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे. त्यामध्ये फायबर ऑप्टीक केबल, क्ट, स्मार्ट पोल, वायफाय यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तर, एरिया बेस डेव्हलपमेंटनुसार स्मार्ट सिटीत निवडलेल्या भागात रस्ते, भौतिक सुविधांची कामे केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून मिळणारा निधी स्मार्ट सिटी कंपनीमार्फत त्याच प्रकल्पांवर खर्च करण्यात येणार आहे.