आई वडिलांकडून मुलांचा अमानुष छळ, पिंपरी- चिंचवडमधील घटना...

वडील आणि सावत्र आईने दोन मुलांना अमानूष मारहाण केल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड येथे समोर आली आहे. निर्दयी मातापिता त्या दोन्ही मुलांचा छळ करत होते. लोखंडी सळईने त्यांनी दोन्ही मुलांच्या पोटावर चटकेही दिले होते. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने दोन्ही मुलांनी घरातून पळ काढला आणि हा प्रकार उघड झाला.
मनीषा सूर्यवंशी आणि गुंडेराव सूर्यवंशी असे या निर्दयी आई- वडिलांचे नाव असून या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काही नागरिकांना शाळेच्या गणवेशातील भाऊ आणि बहीण रात्री उशिरा बाहेर फिरताना दिसले. त्यांनी या मुलांची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला. घरात स्वच्छता करत नाही, खाण्याची अथवा इतर कोणतीही वस्तू खिशात ठेवल्यास वडील आणि सावत्र आई लाकडी दांडक्याने मारहाण करतात, असे त्या मुलांनी रडत रडत सांगितले. इतकंच नव्हे सावत्र आईने त्या दोघांच्या पोटावर चटकेही दिले. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने घर सोडून निघालो, असे त्यांनी सांगितले. यातील मुलगा नऊ वर्षांचा आणि त्याची बहीण सात वर्षांची आहे.

Review