पुण्यात शहर कॉंग्रेस आम्हाला किंमत देत नाही - निष्ठावंतांची खंत

देशात काँग्रेसला अच्छे दिन येत असताना पुणे शहरात मात्र जुन्या नव्या आणि निष्ठावंत यांची सतत धुसफूस होताना दिसत आहे. शहर कॉंग्रेसकडून निष्ठावंताना अपमानित केले जात असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस निष्ठावंतांचा स्वतंत्र मेळावा घेण्याचा निर्धार आज पुण्यातील निष्ठावंतांच्या बैठकीत करण्यात आला. पुढच्या महिन्यात हा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्याला राहूल गांधी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
निष्ठावंतांच्या या बैठकीला आमदार अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, मुक्तार शेख, अनिल सोंडकर, सुनील मलके, काका धर्मावत, डॉ. सतीश देसाई, नरेंद्र व्यवहारे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार असूनही शहर कॉंग्रेसच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमाला बोलावण्यात येत नाही. बोलावलेच तर एका बाजूला बसवून अपमान करण्यात येतो, असे यावेळी आमदार गाडगीळ यांनी सांगितले. देशात कॉंग्रेसला चांगले दिवस येत असताना पुण्यात अशी स्थिती का ? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. मुळात शहर कॉंग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या कार्यक्रमात सामावून घेण्यात येत नाही, असा आरोप आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

Review