७० टक्के पुणेकरांची मला पसंती, लोकसभेसाठी मीच भाजपचा लायक उमेदवार – खासदार संजय काकडे
पुणे (सह्याद्री बुलेटीन) - ७० टक्के पुणेकरांची पसंती आहे, लोकसभेसाठी भाजपकडून मीच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार असल्याचे, सांगत इतर दोघा इच्छुकांपेक्षा मीच उमेदवारीसाठी लायक असल्याचा दावा भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपली दावेदारी त्यांनी जाहीर केली. पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर बुधवारी सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय काकडे यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकत आपली दावेदारी स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून वाडेश्वर कट्टा आयोजित केला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवरांना याठिकाणी आमंत्रित केले जाते. बुधवारी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आगामी लोकसभेच्या धामधुमीच्या निमित्ताने हा कट्टा आयोजित करण्यात आला होता. यावेळी
भाजप खासदार संजय काकडे बोलत होते. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार मोहन जोशी, मनसेचे स्थानिक नेते बाबू वागस्कर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे हे सर्वजण उपस्थित होते.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी झालेल्या मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत आमचा उमेदवार पक्ष प्रमुख ठरवतील. आमच्याकडे स्वतःची उमेदवारी स्वतःच घोषित करण्याची पद्धत नाही, असा खोचक टोला त्यांनी संजय काकडे यांना मारला. तर युती करण्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करतील असे गोऱ्हे यांनी सांगितले. काँग्रेसकडून लोकसभेसाठी आपण इच्छुक आहे. इतर ही काही नेते पक्षात येण्यास इच्छुक आहेत. मात्र, आम्ही ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याच्या मागे सर्वशक्तीनिशी उभे राहू आणि पक्षाला विजय मिळवून देऊ, असे मोहन जोशी यावेळी म्हणाले.