हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. ३ हजार ३१३ कोटी रूपये एवढा या प्रकल्पाला खर्च येणार आहे. २३.३ किलोमिटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. हिंजवडी परिसरातील उद्योगांना या मेट्रोमुळे मोठी चालना मिळणार असून आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचा मोठा फायदा होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
बालेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, खासदार, आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्याच्या महापौर टिळक यांनी पुणेरी पगडी घालून तर पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी भक्ती-शक्ती समूह शिल्प देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
पुण्याने मला भरपूर प्रेम दिले, पुण्याला वंदन करून नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मोदी म्हणाले की, मेट्रोच्या तिसऱ्या फेजचे आज भूमीपूजन करताना अत्यंत आनंद होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आयटीत कामाला आलेल्या लाखों युवकांना या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडचे प्रत्येक टोक जोडले जाणार आहे. साडे चार वर्षापासून आम्ही वाहतूक कनेक्टिव्हीटीवर भर दिली आहे. कारगिल पासून कन्याकुमारीपर्यंत वाहतूक मार्गांचे काम सुरू आहे. वाहतूक, महामार्ग, जलवाहतूक, हवाई वाहतूक आम्ही सुसज्ज करत आहोत. शेतकऱ्यांकरीता देखील वाहतूक व्यवस्थेचा मोठा फायदा होणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मेट्रो आज देशातील शहरांची ‘लाईफ लाईन’ होत चालली आहे. २०१९ मध्ये पुण्यात मेट्रो धावणार आहे. साडे चार वर्षात आम्ही मेट्रो उभारणीवर विशेष लक्ष दिले आहे. देशात ६५० किलोमिटरचे मेट्रोचे काम सुरू झाले आहे. आज संपूर्ण दिल्ली मेट्रोने जोडली गेली. आधीच्या सरकारने काय केले हे सर्वांना माहित आहे. १०० स्मार्टसिटी विकसित केली जात आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे देखील स्मार्ट होणार आहेत. डिजीटल इंडिया, मेकइन इंडियाने देशाच्या विकासाला चालना दिली. सर्वाधिक मोबाईल फोन बनविणारा देश आज भारत आहे. लाखों तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रात १ लाख एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. डिजीटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी शेवटी बोलताना व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्याचे आयटी हब असलेली हिंजवडी जगाच्या पाठीवर स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. लाखोंच्या संख्येने तरूण वर्ग या ठिकाणी दररोज कामाकरिता येतात. मात्र मोठ्या वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अत्यंत उपयोगी पडणार आहे. प्रदुषणाची वाढती समस्या या मेट्रोमुळे सुटणार आहे. आघाडी सरकारमुळे पुण्याचा विकास आराखडा रखडला होता. भाजपाने विकासाचे अनेक कामे या साडे चार वर्षात मार्गी लावलेत. पुणे बदलत आहे. देशातील सर्वोत्तम शहर पुणे भविष्यात होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.