आमदारांनी अधिकाऱ्यांना पाजले स्वच्छतेचे डोस
पिंपरी (साह्यारी बुलेटीन)- पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील या साठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आयुक्त दालनात सोमवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या या बैठकीला महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सर्व शाखा प्रमुख, कार्यकारी अभियंता व प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, सर्रासपणे नदीच्या कडेने राडारोडा टाकला जात आहे. त्याची जबाबदारी कोणाची आहे. त्यामुळे संबधितांवर कारवाई करावी. मोकाट जनावरे, कुत्रे व डुकरे यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरीत कारवाई करावी. रस्ते व साफसफाई नियमित करण्यात यावी. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. शाळा व ओपीडी यांना कलर कोड करावा. 14 वर्षा खालील विद्यार्थ्यांमधून खेळाडू घडावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी पोहण्याच्या तलावासह क्रीडा सुविधा मोफत द्याव्यात.
आमदार महेश लांडगे यांनी शहरातील मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला. मराठी शाळांना करामध्ये सवलत द्यावी, अपंग शाळांना कर माफी द्यावी, सार्वजनिक शौचालयांची देखभाल योग्य पद्धतीने व्हावी. तसेच अनाधिकृत नळ कनेक्शन, शहरातील वाहतुकीसाठी उापययोजना सुचवावी. नागरिकांच्या प्रत्येक किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूस मुतारी, शौचालय उभारणे व त्याची योग्यप्रकारे देखभाल करणे. शाळांचा दर्जा उंचावणे, अनधिकृत फलक, अनाधिकृत बांधकाम, हॉकर्स झोन, भाजी मार्केट सुधारणा, महापालिकेची रुग्णालये व दवाखाने अद्ययावत करणे आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी शहरातील स्थापत्यविषयक विविध कामांची माहिती दिली. यावर येत्या आठवडाभरात सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बैठकीत इशारा दिला.