मंत्र्यांना कांदे फेकून मारण्याचा राज ठाकरे यांचा अजब सल्ला...

नाशिक (सह्याद्री बुलेटिन) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना "सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा अजब सल्ला दिला आहे.

नाशिक दौऱ्यावर असताना बुधवारी कळवण येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘कांदा प्रश्नावर आमची राज ठाकरेंशी चर्चा झाली. हे सरकार ऐकत नसेल तर मंत्र्यांना कांदे फेकून मारा. तसेच मंत्री बेशुद्ध झाले तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’, असे राज ठाकरेंनी सांगितल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आम्हाला मुंबई भेटीचे निमंत्रण दिल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.

दिंडोरी येथे राज ठाकरेंना बघण्यासाठी स्थानिक तरुणांनी गर्दी केली होती. गर्दीमुळे राज ठाकरेंना गाडीबाहेर पडताना अडचणीचा सामना करावा लागला.
देशभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा चर्चेत आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने पडले असून राज्यातील गंभीर बनत असलेल्या कांदा उत्पादकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Review