लोकसभेला भाजप-शिवसेना युती पक्की - अमित शहा

मुंबई (सह्याद्री बुलेटीन)- विरोधकांची आघाडी म्हणजे एक भ्रम होय, अशी कोणतीही आघाडी अस्तित्वात नाही. आगामी लोकसभा शिवसेना-भाजप सोबत लढणार, आमची युती पक्की आहे, असे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले. ते एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, विरोधकांची महाआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही या सर्वांचा पराभव केला होता. ते सर्व प्रादेशिक नेते आहेत आणि एकमेकांना साथ देऊ शकत नाहीत, असेही शाह म्हणाले. भाजप पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यात आणि ओडिशातही सत्ता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या लोकसभेच्या निवडणुका दरम्यान देशात भाजपची केवळ ६ राज्यांत सत्ता होती. मात्र, आता १६ राज्यांत भाजप आहे. त्या आधारे २०१९ मध्ये निवडणुका कोण जिंकेल? असा सवाल ही शाह यांनी कार्यक्रमात केला.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यात निकाल भाजपच्या बाजूने लागला नसला तरी याचा संबंध २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. देशात भ्रष्टाचाराचा केलेला बिमोड, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आठ कोटी घरांमध्ये शौचालयाची व्यवस्था आणि अडीच कोटी घरांमध्ये वीज आणी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Review