जादा दराने निविदा काढून महापालिकेची लूट - सत्ताधारी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा भाजप ला घरचा आहेर
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांनी भाजपलाच घरचा आहेर देत महापालिकेच्या होणाऱ्या लुटीवरती आवाज बुलंद केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत अनागोंदीपणे कारभार चालला आहे. गेल्या तीन महिन्यापासून जादा दराने निविदा निघत आहेत. तेच-तेच ठेकेदार येत आहेत. प्रशासन ठेकेदारांच्या सोबत आहे. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून महापालिका लुटत आहेत. कितीही लुटले तरी कोणाला समजत नाही, असे प्रशासनाला वाटत आहे. हे सर्व समजत असून आम्हाला कोणत्याही ‘पापात’ सहभागी व्हायचे नाही, असा हल्लाबोल सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महासभेत केला. वाघेरे यांनी असा हल्लाबोल केल्याने भाजपच्या इतर नगरसेवकांसह विरोधकांनीही शहरात एलडी दिवे बसविण्याच्या विषयाला तीव्र विरोध केला. अखेर सत्ताधाऱ्यांना हा विषय फेटाळण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब महासभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवर शहरात एलडी दिवे बसविण्याचा विषय होता. त्याला सत्ताधारी नगरसेवकांसह सर्वपक्षिय नगरसेवकांनी विरोध केला.
भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ईईएसएल कंपनीकडून एलडी खरेदी करणे बंधनकारक नाही. तरीपण त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी अट्टहास कशासाठी केला जात आहे. अधिकारी, ठेकेदार यांच्या संगनमताने महापालिका लुटण्याचे काम सुरू आहे. महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू आहे. हा कारभार थांबला पाहिजे.
शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे म्हणाले, हा विषय चुकीच्या पद्धतीने आणला आहे. त्याला आमचा विरोध आहे. भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, हा विषय महासभेसमोर येणे अपेक्षित नव्हता. शहरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच ईईएसएल कंपनीकडून एलडी खरेदी करणे बंधनकारक नाही. यामध्ये सर्व नगरसेवकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, शहरात सर्वत्र एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. केवळ 25 ते 30 काम शिल्लक आहे. तरी, देखील सरकारला 77 कोटी रुपये का द्यायचे? त्याचे दर बदलून आणावेत. यामुळे महापालिकेचे 50 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. याचे सत्ताधा-यांनी भान ठेवावे.
आपल्याच नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे महापौर राहुल जाधव यांना हा विषय फेटाळावा आहे.