ससूनचे डॉक्टर ठरले देवदूत : विमानप्रवासात रुग्णाला दिले जीवदान
पुणे(सह्याद्री बुलेटीन)- नागपूर ते पुणे दरम्यान विमान प्रवासामध्ये मूळच्या कोल्हापूर येथील प्रवाशाला तातडीची वैद्यकीय सेवा पुरवून अक्षरश मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम ससून सवरेपचार रुग्णालयातील डॉक्टरने केले. डॉ. उदय राजपूत असे या डॉक्टरांचे नाव असून ते ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात.
डॉ. राजपूत सोमवारी (१७ डिसेंबर) नागपूरहून पुण्याला विमानाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान वैमानिकाने प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर असल्यास मदतीसाठी यावे अशी उद्घोषणा केली. त्या वेळी डॉ. राजपूत यांनी प्रवासी रुग्णाच्या दिशेने धाव घेतली असता रुग्णाचा श्वासोच्छवास आणि हृदयक्रिया थांबली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. राजपूत यांनी तातडीच्या जीवरक्षक उपचारांची (सीपीआर) अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. हे उपचार सुरू करताच हळूहळू रुग्णाचा श्वास आणि हृदयक्रिया पूर्ववत झाली आणि रुग्णाला जीवदान मिळाले. विमान कंपनी आणि सहप्रवाशांनी डॉ. राजपूत यांचे अभिनंदन केले.