
कचऱ्याचे डब्बे कचऱ्यात जमा ? खरेदी थांबवली - पुणे महानगर पालिकेचा निर्णय
पुणे (सह्याद्री बुलेटिन ) - पुण्यातील कचऱ्याचे डब्बे खरेदी न करता कचरा प्रक्रियेवर भर देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.
शहरातील नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी नगरसेवकांकडून पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा डब्यांची खरेदी करण्यास सन २००३-०४ मध्ये प्रारंभ झाला. संत गाडगेबाबा अभियानाअंतर्गत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी या प्रकारचे कचरा डबे वाटप करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. तत्कालीन महापालिका आयुक्त टी. सी. बेंजामिन यांच्या कार्यकाळात महापालिकेकडून नागरिकांना कचरा डब्यांचे वाटप करण्यास सुरुवात झाली आणि नगरसेवकांमध्ये हा उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
गेल्या तीन वर्षांत नगरसेवकांकडून वॉर्डस्तरीय निधीतून १३ लाख कचरा डब्यांची खरेदी करण्यात आली. दरवर्षी साधारण एक कोटी रुपयांची खरेदी नगरसेवकांकडून करण्यात येते. कधी-कधी नागरिकांची मागणी आहे, असे कारण पुढे करून एक कोटींपेक्षाही जास्त खर्च झाला. गेल्यावर्षी म्हणजे २०१७-१८ या वर्षी तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून डब्यांची खरेदी महापालिकेकडून करण्यात आली होती. खरेदीबाबतचे स्पष्ट धोरण नसल्यामुळे वारेमाप खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येत होते.
कचरा वर्गीकरणासाठी नगरसेवकांकडून नागरिकांना विनामूल्य वाटप होत असलेल्या प्लास्टिक कचरा डब्यांच्या खरेदीतील हिशेबाचा गोंधळ, कचरा डब्यांच्या माध्यमातून नगरसेवक करत असलेली प्रसिद्धी, वाटपाचा बेशिस्त कारभार आणि गैरव्यवहाराच्या पाश्र्वभूमीवर यापुढे प्लास्टिक कचरा डब्यांची (बकेटस्) खरेदी न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून उठसूठ केल्या जाणाऱ्या कचरा डबा वाटपाला चाप लागला असून कचरा डब्यांची खरेदी करण्याऐवजी कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे धोरण येत्या काही दिवसात महापालिका प्रशासन तयार करणार आहे.