पिंपरी-अल्पवयीन मूकबधिर बहिणीवर चुलत भावाचा बलात्काराचा प्रयत्न
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)-चिखली पोलीस ठाण्याच्या परिसरात नराधम चुलत भावाने अल्पवयीन मूकबधिर बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय आरोपी हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. चुलता आणि चुलती यांची नजर चुकवून तो बहिणीला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि हे कृत्य केलं. 11 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत काल संध्याकाळी तक्रार दाखल करण्यात आली. घरचं प्रकरण असल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचं समजतंय. तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणी नराधम चुलत भावाला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
11 डिसेंबर रोजी 27 वर्षीय आरोपीने कामावरून परतताना थेट चुलत्याचे घर गाठले. चुलता,चुलती आणि 13 वर्षीय मूक बधिर असलेली बहीण घरी होते. चुलती स्वयंपाक करत होती तर चुलते लघुशंका करण्यासाठी गेले. एवढ्यातच दोघांची नजर चुकवून त्याने बहिणीला स्वतःच्या घरी घेऊन गेला. आई वडिलांनी मुलीचा शोध सुरू केला, मूकबधिर असल्याने ती शेजारच्या व्यक्तीकडे गेली नाही ना याची खात्री करत होते, पण ती सापडत नव्हती. अखेर आरोपी पुतण्याला फोन करून तुझ्या बहिणीला घेऊन गेलास का? असं विचारल तेव्हा ती तिथे असल्याचे समजले.
दरम्यान, फोन आल्यानंतर आरोपी तिला तिच्या घरी घेऊन गेला. परंतु मुलीची अवस्था आणि कपडे पाहून दुष्कर्म केल्याचे चुलतीला समजून आले. तेव्हा आरोपी पुतण्याला जाब विचारला असता माझ्याकडून चूक झाली असं तो म्हणाला. तसंच, याबाबत कोणासमोर वाच्यता केल्यास तुमच्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही आरोपी पुतण्याने चुलता आणि चुलतीला दिली होती. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.