हिंजवडीत पादचारी तरुणाला मारहाण करुन केली लुट..
चिंचवड,(सह्याद्री बुलेटीन) – पायी चालत असलेल्या एका तरुणाला दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या टोळक्यांनी आढवून चाकु, लाकडी बांबु आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील पाकीट जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.२७) दुपारी सव्वाएकच्या सुमारास हिंजवडीतील हॉटेल बारबेक्युच्या गेटसमोर घडली.
सुमेन महेरा करेजी (वय २२, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) असे मारहाण करुन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोहेल इस्माईल शेख (वय १९, रा. वाल्हेकरवाडी रोड, विठाई कॉमप्लेक्स) आणि अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमेन हा गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास हिंजवडीतील हॉटेल बारबेक्युच्या गेटसमोरुन पायी चालला होता. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांनी चाकु, लाकडी बांबु आणि लाथाबुक्क्यांनी सुमेनला जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच त्याच्याजवळील पाकीट जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले. त्या पाकिटामध्ये ७०० रुपये रोख, आधार कार्ड, आणि इतर म्हत्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, आरोपी सोहेल शेख याला अटक करण्यात आली असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.