नगरमध्ये असंघाशी संघ आणि सत्तेशी गाठ

अहमदनगर ( सह्याद्री बुलेटिन ) - संख्याबळात तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेलेल्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असलेल्या राष्ट्रवादीचे सहकार्य मिळवत सर्वाधिक संख्याबळ प्राप्त झालेल्या शिवसेनेला सत्तेपासून रोखले. शुक्रवारी झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही पदांवर भाजपचे बाबासाहेब वाकळे व श्रीमती मालन ढोणे विजयी झाल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश धुडकावत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. केडगाव उपनगरातील दुहेरी हत्याकांडात पक्षाच्या दोन आमदारांना शिवसेनेने अडकवल्याचा संताप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दाखवून दिला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेवटच्या क्षणी या घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे नगरला महापालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच भाजपला महापौरपद प्राप्त झाले.

राज्यात विरोधी पक्षांची भाजपविरोधी आघाडी तयार केली जात असतानाच नगरमध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजप व सेनेबरोबर जायचे नाही, अशी स्पष्ट सूचना पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाने याची दखल घेत आता पक्षाच्या १८ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पक्षाचे बहुसंख्य नगरसेवक हे पक्षापेक्षा आमदार जगतापद्वयीचे समर्थक आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय हे नगरसेवक वेगळा निर्णय घेणे शक्य नाही. हे एकाएकी घडले असे नाही, निवडणूक निकालानंतर लगेचच काही दिवसांत भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार हे स्पष्ट झालेले होते. त्याची पूर्वकल्पना पक्षाच्या श्रेष्ठींनाही आली होती. पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असे सांगत काही दिवसांपूर्वी समर्थनही केले होते.

भाजप व राष्ट्रवादीचे एकत्र येणे जिल्हय़ातील आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम करणारे ठरेल, त्याचा फायदा शिवसेनेला होईल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे, तो भाजपकडून फेटाळला जात आहे. राज्यातील युती सरकारवरही त्याचा परिणाम होणार नसल्याचा दावा महाजन यांनी केला.

Review