श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांना धक्का : कट्टर समर्थक पोटे विरोधकांच्या गळाला...
श्रीगोंदा ( सह्याद्री बुलेटिन ) - श्रीगोंद्यात राजकीय वातावरण तापले असून बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक मनोहर पोटे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही आघाडीत प्रवेश केला आहे, असे आमदार राहुल जगताप व काँग्रेस जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
पोटे यांच्या पत्नी २७ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार असतील. सध्या पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आहे, पोटे हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार होत्या. मात्र सोमवारी त्यांना मोठा धक्का देण्यात आला. आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोटे यांच्या पत्नी शुभांगी या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही भाजपला रामराम ठोकून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी प्रवेश केला आहे. त्यांचे सुपुत्र गणेश भोस हे निवडणुकीत आघाडीचे उमेदवार असतील.
माजी मंत्री बबनराव पाचपुते हे २७ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक महिन्यांपासून श्रीगोंदा येथे तळ ठोकून आहेत. श्रीगोंदा नगरपालिकेत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. असे असताना त्यांचे कट्टर समर्थक नगराध्यक्ष मनोहर पोटे बाबासाहेब भोस, नगरसेवक सतीश मखरे,स्वीकृत नगरसेवक गणेश भोस यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीत प्रवेश केला. यामुळे आता हे राजकीय महाभारत कसे रंगात जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.