मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा अपघात - एकाचा मृत्यू
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाला. इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कार चालकाला डुलकी आली आणि तो थेट पुढे जात असलेल्या ट्रक खाली घुसला.
यात त्याचा जागीच मृत्यू तर शेजारी बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला. त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातामुळे काही काळ मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही एक अपघात झाला. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास वडगाव फाटा येथे गॅस कॅटेनर आणि स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. यात स्कॉर्पिओमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. या दोन्ही गाड्या पुण्याहून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. यामुळे मुंबई मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहे.