हिंजवडीत वाहतूक पोलिसांची नजर चुकवून जॅमरसह वाहनांची चोरी
हिंजवडी,(सह्याद्री बुलेटीन)- वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहनांना जॅमर लावले . वाहतूक पोलिसांचे लक्ष दुस - या कामाकडे जाताच वाहन धारकांनी जॅमरसह वाहने नेली . असे दोन गुन्हे हिंजवडी वाहतूक विभागाकडून दाखल करण्यात आले आहे . वाहतूक पोलिसांची नजर चुकवून सिग्नल तोडणे , वेगात वाहन चालवून सिग्नल क्रॉस करणे , वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवायचं आणि वाहतूक पोलीस दिसताच एखाद्या मोठ्या वाहनाच्या आडोशाने पुढे जायचे . असे अनेक प्रसंग चौकाचौकात दिसतात . अनेकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येते . मात्र काही वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावला असता वाहनधारकांनी चक्क जॅमरसह वाहन नेले.
हिंजवडी मधील जॉमेट्रिक चौकात नो एंट्रीमध्ये एका चालकाने त्याची दुचाकी ( एम एच १२ / के एच ११९१ ) पार्क केली . वाहतूक पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या दुचाकीला जॅमर लावला . चालक दुचाकीजवळ नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या वाहतूक नियमनाच्या कामात लक्ष वळवले . याचा फायदा घेत दुचाकीस्वार बहाद्दर जॅमरसह दुचाकी घेऊन गेला . दुस - या एका घटनेत हिंजवडी वाहतूक विभागाजवळ एका ऑटो रिक्षाला ( एम एच १२ / जे एच १७७० ) जॅमर लावला . वाहतूक विभागाजवळ लावलेला रिक्षा जॅमरसह गायब झाला आहे . या दोन्ही घटनांबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत .