ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर -भारतीय संघाचा विजय

सिडनी - विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २ – १ ने विजयी झाला आहे. सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी सामन्यावर भारताची मजबूत पकड होती पण पावसामुळे शेवटच्या दिवशी खेळ झालाच नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित जाहीर केला आणि भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. चेतेश्वर पुजारा सामनावीर आणि मालिकावीर ठरला.

 

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात ६२२ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला. चौथ्या दिवसापासून पावसामुळे खेळात व्यत्यय येत होता. ४ थ्या दिवशी केवळ २५ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद ६ धावा होती. भारतीय संघ ३१६ धावांनी आघाडीवर होता. ५ व्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचे १० गडी बाद करायचे होते पण पावसामुळे खेळ सुरूच झाला नाही. सिडनी कसोटीच्या आधी भारतीय संघ २ -१ असा आघाडीवर असल्याने भारताने मालिका जिंकली.

 

Review