पुणे : हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी
पुणे : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वरांवर शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध भागात कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध संघटना एकत्रित आज हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी पार पडला.
या दशक्रिया विधी दरम्यान हेल्मेट, दारूच्या बाटलीत चहा, वडा पाव, भेळ अशा वस्तू ठेवून हा विधी पार पडला. हेल्मेट कारवाईचा शहरातील सर्व राजकीय पक्षाकडून आंदोलनातून निषेध करण्यात येत आहे. शिवसेनेकडून 3 जानेवारी रोजी अंत्ययात्रा देखील काढली होती. दशक्रिया विधीमध्ये हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर,नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक धनंजय जाधव, काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलीसकडून कायद्याचा धाक दाखवित हेल्मेट सक्ती केली जात आहे. ही निषेधार्थ बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता. हेल्मेट सक्ती राबविणे चुकीचे आहे. अशी भूमिका मांडत ते पुढे म्हणाले की, वाहतुक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.