दलालांना मलई खायला मिळत नाही, मोदींचा काँग्रेसवर आणि गांधी कुटुंबीयांवर टीकास्त्र
सोलापूर,(सह्याद्री बुलेटीन)-विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यास सोलापूर येथे आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकार आणि गांधी कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. २००४ ते २०१४ या काळात दिल्लीत रिमोट कंट्रोलचे सरकार सत्तेवर होते. या १० वर्षांत या सरकारने गरिबांसाठी काहीच काम केले नाही. त्यांनी शहरातील गरिबांसाठी १० वर्षांत ८ लाख घरे बांधली. एवढ्या मोठ्या देशात एका वर्षाला फक्त ८० हजार घरे बांधली. पण भाजपा सरकारने ४ वर्षांतच १४ लाख घरे बांधली, असे म्हटले. यावेळी त्यांनी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील अटकेत असलेल्या ख्रिश्चियन मिशेलचे उदाहरण देत देशात आता आमच्या काळात दलालांना मलई खायला मिळत नसल्याचे म्हटले. कर चोरी, संरक्षण करारात लाचखोरीचा आरोप असलेल्यांना आता उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटला आहे. चौकीदार चोर असल्याचे ते सांगत आहेत. पण आता मिशेल मामाबरोबर त्यांचे काय संबंध होते, हे सांगण्याची वेळ आली आहे. केंद्रातील सरकार आता दलाल मुक्त भारत करणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.