बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकर वेठीस
मुंबई ,(सह्याद्री बुलेटीन)-वेतनासह अन्य मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले. संपात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या असून बुधवारी तोडगा निघाला नाही, तर मुंबईकरांचे हाल कायम राहण्याचीच चिन्हे आहेत.
मंगळवारी दिवसभर मुंबई पालिका, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या बैठका झाल्यानंतरही मागण्यांसंदर्भातील चर्चा निष्फळ ठरली. मुंबई पालिकेने तर ‘बेस्ट’ला आर्थिक मदत देण्यास स्पष्ट नकारच दिला. त्यामुळे मागण्यांवर बुधवारी तोडगा निघाला नाही तर मुंबईकरांचे हाल कायमच राहण्याची शक्यता आहे. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत बेस्ट प्रशासनाने दिले आहेत.
बेस्टमधील चालक, वाहकांसह ३० हजार कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री संप पुकारला. दहा ठिकाणी या संपाला मध्यरात्रीपासूनच हिंसक वळण लागले. यामध्ये झालेल्या दगडफेकीत वडाळा आगारातील एक चालक जखमी झाला. मंगळवारी सकाळपासून बेस्ट संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसण्यास सुरुवात झाली. रिक्षा, टॅक्सी पकडण्यासाठी लांबच लांब रांगा होत्या. तर रिक्षा-टॅक्सी चालकांकडून जादा भाडे आकारले जात असल्याने घर ते रेल्वे स्थानक व कार्यालय ते स्थानक गाठण्यासाठी पायपीटही केली.
संप मोडून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने ‘मेस्मा’ कायदा लागू केला होता. त्याचप्रमाणे एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून जादा गाडय़ा सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटी आणि रेल्वेने नियोजनही केले. संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट उपक्रम, संघटनेचे पदाधिकारी यांची मुंबई पालिकेत सकाळी ११ च्या सुमारास बैठकही झाली. या बैठकीला मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, कृती समितीचे नेते शशांक राव आणि अन्य पदाधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर उपस्थित होते. मुंबईत कोस्टल रोडसह अनेक प्रकल्प सुरू असल्याने पालिका बेस्टला मदत करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र संघटनेचे नेते मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर दुपारी बेस्ट उपक्रमाच्या मुख्यालयात संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळीही महाव्यवस्थापक बागडे आणि संघटनेच्या नेत्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली त्यामुळे बुधवारीही संप कायम राहणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
कारवाई होणार आम्ही मेस्मा लागू केला आहे. तसेच न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवल्यानंतरही कर्मचारी संपात सामील झाले. त्यामुळे आम्ही मेस्मांतर्गत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. बुधवारी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई सुरू होईल, असे बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी सांगितले.
मागण्या काय?
* २००७ पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,९३० रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरित वेतननिश्चिती करावी.
* एप्रिल २०१६ पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात.
* २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस द्यावा.
* कर्मचारी सेवा
* निवासस्थानांचा प्रश्न तातडीने सोडवावा. अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.
संप कायमच राहणार : मंगळवारी झालेल्या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संप कायम राहणार आहे, असे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. प्रशासनाला संपावर तोडगा काढण्याची इच्छाच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.