पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागातील विविध विकासकामांची पाहणीसाठी महापौरांचा दौरा
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्टसिटीत समावेश झालेल्या प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर – रहाटणी येथील विविध विकास कामाची महापौर राहुल जाधव यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यावेळी प्रभागातील रोझआयकॉन शेजारी ‘प्ले ग्राउंड’, ४५ मीटर बीआरटीएस रोड वरील ‘लीनीयर गार्डन’, पिंपळे सौदागर गावातील व्यायामशाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई, गोविंद-यशदा चौकातील सब-वे, विविध बस स्टॉप, रोझलँड रेसिडेंसी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान तसेच उद्यानामधील पाण्याच्या टाकीच्या कामाची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली. यावेळी नाना काटे यांनी संपूर्ण प्रभागातील विकास कामांची माहिती महापौरांना दिली. तसेच प्रलंबित प्रश्नांकडेदेखील महापौरांचे लक्ष वेधले. या प्रभागातील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच स्वच्छता ठेवण्याच्या सूचना महापौरांनी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी विजय खरोटे, सहाय्यक उद्यान अधिक्षक पी.एम.गायकवाड, क्रीडा विभाग उप अभियंता गेंगजे, विद्युतचे उपभियंता गलगले, स्थापत्य उपभियंता डी.एन.गट्टूवार, स्थापत्य विभागाचे उप अभियंता सुनील पाटील, स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, नगररचना उपअभियंता बागवानी, जल नि:सारणचे उपअभियंता सुर्यकांत मोहिते, सहाय्यक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे आदी उपस्थित होते.