‘बेस्ट’चा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच, प्रवाशांचे व मुंबईकरांचे हाल
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल गुरुवारीही सुरूच राहिले. उत्पन्न बुडाल्याने ‘बेस्ट’लाही या संपामुळे पाच ते सहा कोटींचा महसूली फटका बसला आहे. गुरुवारी संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारीही संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
विविध मागण्यासंदर्भात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला सोमवारी मध्यरात्रीपासूनच चांगला प्रतिसाद मिळू लागला. तीन दिवसानंतरही या संपावर तोडगा न निघाल्याने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवसी मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरुवारीही बेस्टच्या आगारात बस उभ्याच होत्या.
बुधवारी संप मिटवण्यासाठी मुंबई पालिकेप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले. मागण्यांसदर्भात दिवसभरात बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांत सुरू असलेल्या बैठकातून तोडगा निघाला नव्हता. गुरुवारी सकाळी पुन्हा बेस्ट उपक्रम व बेस्ट संघटनांमध्ये बैठक होणार आहे.
संपावर तोडगा निघाला नाही तर ‘बेस्ट’ उपक्रमातील कार्यालयीन कर्मचारी आणि वीज पुरवठा विभागातील कर्मचारीही संपात सहभागी होतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी संपावर तोडगा निघाला नाही तर मुंबईकरांच्या अडचणीत भर पडू शकते. शहरातील वीज पुरवठाही खंडीत होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, वाशी, पनवेलसाठीही जादा फेऱ्यांची सोय केली आहे.