बेस्टचा संप पाचवा दिवस,चर्चा फिसकटली- महापालिकेचे सफाई कर्मचारीही सहभागी होणार
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- न्यायालयात आश्वासन दिल्यानुसार राज्य सरकारने बेस्टच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीसोबतची चचार्ही फिसकटल्याने संप चिघळल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. कामगारांच्या रात्री झालेल्या मेळाव्यात मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि तसे लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप सुरूच ठेवून चर्चेला जाण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे सलग आजच्या पाचव्या दिवशीही बेस्टचा संप सुरूच आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात आजपासून महापालिकेचे सफाई कर्मचारीही सहभागी होणार आहेत. याचबरोबर, अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगार संघटनेनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या संपामुळे घर आणि कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्कूल बस संघटना, लक्झरी बस संघटना मुंबईकरांच्या मदतीला धावणार असून दिव्यांग आणि वृद्धांना मोफत सेवा देणार असल्याचे समजते.
राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्रीच धोरणात्मक निर्णय घेऊन लेखी आश्वासन देऊ शकतात. सध्या ते दिल्लीत आहेत. साहित्य संमेलनाला हजेरी लावून ते रविवारी परतण्याची चिन्हे आहेत. बेस्ट संपाच्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे तत्पूर्वी संप मिटवण्याच्या हालचाली होण्याची चिन्हे आहेत. संप सुरूच राहण्याचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून प्रतिक्रिया देत संप लवकर मिटावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मुंबई महापालिका राज्य सरकारपेक्षा श्रीमंत असल्याचे सूचक वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांनी पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचा हेका तिन्ही दिवसांच्या बैठकीत कायम ठेवला होता. हा संप सुरूच असल्याने आणि त्यावर निर्णय होत नसल्याने सर्व स्तरातील कामगार संघटनांनी बेस्ट कामगारांना पाठिंबा दिल्याने त्याची व्याप्ती वाढू लागली आहे.
हाल कायमच
कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शनिवारी सलग पाचव्या दिवशी त्यामुळे घर आणि कार्यालय गाठण्यासाठी चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला.