अमित शहा यांना कर्नाटकी जनतेच्या शापामुळे झाला स्वाईन फ्लू – काँग्रेस खासदार
नवी दिल्ली(सह्याद्री बुलेटीन) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संबंधी काँग्रेस नेता आणि खासदार बीके हरिप्रसाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अमित शहा यांना कर्नाटकाचा शाप लागला आहे. म्हणून त्यांना स्वाईन फ्लू झाला, असे हरिप्रसाद यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
कर्नाटकमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून भाजप घोडेबाजारी करून सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस सरकार उलथविण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना झालेल्या स्वाईन फ्लूबद्दल बोलताना बीके हरिप्रसाद म्हणाले कि, कर्नाटकला आणखी हात लावल्यास त्यांची (अमित शहा) तब्येत बिघडेल. कर्नाटकमधील सरकारला हात लावल्यामुळे त्यांना जनतेचा शाप मिळाला आहे. आमच्या अध्यक्षांबद्दलही चुकीचे बोलतात, असे हरिप्रसाद यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल शहा यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ईश्वराची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छांमुळे मी लवकर बरा होईन, असेही त्यांनी टिवटमध्ये म्हटले आहे.