अपहरण केलेल्या तरुणाचा केला खून-मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना
पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – खंडणीसाठी अपहरण केलेल्या सोळा वर्षाच्या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडीत घडली आहे. हा प्रकार गुरूवारी (दि. 17) उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
निखिल अनंत अंग्रोळकर (16 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (वय 22) या तरुणाला अटक केली आहे. चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यान रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल घरी परत न आल्याने त्याचे वडील अनंत अंग्रोळकर यांनी वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निखिल हा बिनयसिंग राजपूत याच्यासोबत गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले.