मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांना मिळणार पिझ्झाची सुविधा
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- भारतीय रेल्वेने आधुनिकीकरण करायचे ठरविले असून आयआरसीटीसीने पिझ्झा पुरवठ्याची सुविधा मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर केली आहे.
हे मशीन ऑटोमॅटिक असेल असे सांगण्यात आले. आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिल्यानंतर प्रवाशांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.आपली ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांना या मशीनमध्ये आधी कॉईन घालावे लागणार आहे. यामध्ये फ्रेश पिझ्झा बेस तयार केला जाणार आहे. मग त्यावर सॉस आणि टॉपिंग्जच्या माध्यमातून पिझ्झा तयार होणार आहे. त्यानंतर तो ओव्हनमध्ये बेक होऊन येणार आहे. त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर भूक लागली तर हा एक उत्तम उपाय उपलब्ध असेल.
याप्रमाणेच फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, आईसक्रीम आणि फ्रूट ज्यूस यांचीही मशीन लवकरच दाखल होतील. सध्या रेल्वेमध्ये ती पुढील स्टेशनला पोहोचायच्या आधी दोन तास पिझ्झाची ऑर्डर द्यायची सुविधा उपलब्ध आहे. हा पिझ्झा थेट तुमच्या सीटवर येऊन तुम्हाला मिळतो. दूरच्या प्रवासासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. मुंबईत सुरुवातीला ही पिझ्झाची सुविधा मुंबई सेंट्रल स्थानकावर मिळत असली तरी कालांतराने इतरही स्टेशनवर ही सुविधा मिळणार आहे.