संतपीठ उभारणीचा प्रस्ताव आज महासभेपुढे

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयवादात अडकलेला चिखली टाळगाव येथील संतपीठ उभारणीचा वादग्रस्त प्रकल्प अंतिम मान्यतेसाठी शनिवारी (दि.१९) महापालिका सभेपुढे मांडण्यात आला आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज संतपीठ या कंपनीला तसेच नियोजित संचालक मंडळाला मान्यता देण्याचा मसुदा प्रस्तावात समाविष्ट आहे.

भागवत धर्मातील वादन, गायन, कीर्तन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी आणि नव्या पिढीला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा हेतू ठेवून पालिकेकडून संतपीठाची उभारणी करण्यात येणार आहे. सुरुवातीपासून संतपीठ वादाच्या भोवऱ्यात आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात सध्या संतपीठावरून संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी संतपीठासाठी निविदा काढण्यात आली.

जादा दराची निविदा काढण्यात आल्याने महापालिका तिजोरीवर पाच कोटींचा जादा भार पडला आहे. त्यात संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर यातील अर्थकारणही चव्हाट्यावर आले आहे. या संदर्भात स्थापन झालेल्या समितीवरून पुन्हा वादंग सुरू आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरु आहे.

संतपीठ समितीचे अध्यक्षपद आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले असून, डॉ. सदानंद मोरे, महापालिका अधिकारी जितेंद्र काळंबे, ज्योत्स्ना शिंदे, पराग मुंढे, चंद्रकांत इंदलकर तसेच निवृत्त उपजिल्हाधिकारी तानाजी शिंदे, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजू ढोरे, सल्लागार स्वाती मुळे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित कंपनीला तसेच समितीला मान्यता देण्याचा प्रस्ताव सभेपुढे आहे. या विषयावरून सभेत वाद होण्याचे संकेत आहेत. नियोजित कंपनी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर स्थापन करण्यात येणार आहे. क्षितिज लुंकड यांची कंपनीचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कंपनी स्थापन केल्यानंतर अभ्यासक्रम निश्‍चित केला जाणार आहे.

Review