आयटी अभियंता तरुणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग

हिंजवडी,(सह्याद्री बुलेटीन) - एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता तरुणीला चेन्नई येथून बोलावून तिचा विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे 16 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी पीडित तरुणीने रविवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पिनाक नेपाल मुजुमदार (वय 30, रा. मारुंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजुमदार आणि फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील काही वर्षांपूर्वी दोघेजण चेन्नई येथील एका आयटी कंपनीमध्ये एकत्रित काम करत होते. त्यानंतर आरोपी हिंजवडी येथील एका आयटी कंपनीमध्ये नोकरीनिमित्त आला. आरोपी तरुणाचा डिसेंबर महिन्यात वाढदिवस होता. त्यासाठी फिर्यादी तरुणी चेन्नईहून पुण्याला आली होती. त्यावेळी आरोपीने तरुणीला एकतर्फी प्रेमातून 'मी तुझ्यावर खूप दिवसांपासून प्रेम करतो. तू काहीच प्रतिसाद देत नाहीस.' असे म्हणत तरुणीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत तरुणीने हिंजवडी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.

Review