गुगलने डुडलमार्फत देशवासियांना कलरफुल शुभेच्छा

नवी दिल्‍ली,(सह्याद्री बुलेटीन )-देशभरात प्रजासत्ताक दिन उत्‍साहात साजरा होत आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गुगल डुडलमार्फत देशवासीयांना शुभेच्छा देण्‍यात येतात. आजही गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाच पद्धतीने देशवासीयांना 'गुगल ‘डुडल’च्या माध्यमातून भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगल डुडलच्‍या माध्‍यमातून राष्ट्रपती भवन आणि राजपथावरील सामर्थ्य, संस्कृती आणि वैविध्यता साकारली आहे. हे गुगल 'डुडल' सात रंगात पाहायला मिळत आहे. सात रंगात वैविध्‍यता दाखवण्‍यात आली आहे. या सात रंगात भारताची सामर्थ्य फुलून निघाले आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. हिच विविधता या गुगल 'डुडल'मध्‍ये पाहायला मिळत आहे.

इंग्रजाच्‍या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता.

Review