दोन महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक : राहुल गांधी
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सोमवारी (ता. ४) निवडणूक आयोगाची भेट घेण्याचे निश्चित केले. अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम मुद्यावर चर्चा केली. या चर्चेनंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, बसापचे सतीशचंद्र मिश्रा, डीएमकेच्या कनीमोळी, तृणमुल काँग्रेसच डेरेक ओब्रायन, कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे टी. के. रंगराजन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, आम आदमीचे संजयसिंह, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी आदी नेत्यांनी बैठकीला उपस्थिती लावली.
काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटनी, जेडीएसचे दानीश अली आणि शरद यादव आदी नेते उपस्थित होते. राहुल म्हणाले की, आमची बैठक चांगल्या वातावरणात पार पडली. आम्ही तीन मुद्यांवर चर्चा केली. यामध्ये नोकऱ्या, शेती आणि घटनात्मक संस्थांवरील हल्ला यांचा समावेश होता. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही एकत्र भेटणार आहोत.
नोकऱ्या, शेती आणि घटनात्मक संस्थावरील हल्ला आणि राफेल करारामध्ये मोदींनी केलेला भ्रष्टाचार याच मुद्यावरून आगामी निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी नमूद केले. येत्या दोन महिन्यात सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. हा सर्जिकल स्ट्राईक राफेल, नोकऱ्या आणि नोटबंदीवरून असेल असे ते म्हणाले.