दारिद्री सरकारमुळे डान्सबार पुन्हा सुरू; अजित पवारांची भाजपवर सडकून टिका
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- शिवरायांचे नाव घेऊन हे सरकार सत्तेत आले. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती स्थगिती दिली. मुलं चुकिच्या रस्त्यानं जाऊ नयेत म्हणून आम्ही राज्यात डान्सबार बंदीचा कायदा केला होता. परंतू या ‘दरिद्री’ सरकारने पुन्हा डान्सबार सुरू करण्याचा मार्ग मोकळा केलायं. हे कसलं सरकार यांना आता घरचा रस्ता दाखविला पाहिजे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगवी येथे परिवर्तन सभेत बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा पिंपरी चिंचवड येथे पोहोचली. सांगवी येथे झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक, पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शहरातील गुन्हेगारी वाढली असून मटका, गुटखा जोरात चालू आहे. गाड्या फोडल्या, जाळल्या जात आहेत. दहशत माजबिली जात आहे. पोलिसांचा वचक राहिला नाही. गुन्हेगारांना भाजप नेत्यांचे संरक्षण मिळत आहे. आमची सत्ता असताना चुकीच्या गोष्टींना कधीच पाठीशी घातले नाही. भाजपच्या राज्यकर्त्यांना शहराचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. यांचे ऐकणारे कोण नाही. त्यामुळे शहरवासीयांवर अन्याय होत आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका जागी बसून बटणे दाबतात, शहराविषयी त्यांनाही आस्था वाटत नाही, लोकांत जावेसे वाटत नाही हे सरकार सुटबुटवाल्यांचे सरकार आहे अशी टीका पवार यांनी केली.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना आम्ही डान्सबारवर बंदीचा कायदा केला. लाखो कुटूंबांचे आयुष्य यात बरबाद झाले होते. दिवंगत आर.आर.पाटील यांनी या बंदीसाठी ठाम भूमिका घेतली होती. मात्र हे सरकार दरिद्री आहे. यांच्या नाकार्तेपणामुळेच डान्सबारवरील बंदी उठली आहे. न्यायालयात यांनी ही बंदी टिकवता आली नाही. चांगला वकील दिला असता तर ही बंदी कायम राहिली असती. परंतू यांची मानसिकताच नाही. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात सर्वांत उंच पुतळा उभारला जाणार होता. त्या शिव स्मारकाला मात्र स्थगिती आली आहे. आता तुम्हीच बघा यांचा ‘न्याय’. महाराजांच्या स्मारकाला स्थगिती आणि डान्सबारची बंदी उठवली. हे देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.